देवगड
विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून 14 कि.मी.
अंतरावर आणि विजयदुर्ग पासून 18 कि.मी. अंतरावर
वाडा हे गांव आहे. या गावापासून 1 कि.मी. अंतरावर
किंवा वरील मार्गावरील विमलेश्वर मंदिर थांबा
येथून अर्धा कि.मी. वर फणसे -पडवणे जाणा-या
रस्त्याला लागूनच श्री देव विमलेश्वर मंदिर
आहे. येथून काही अंतरावर सुंदर पडवणे सागरकिनारा
आहे. संपूर्ण उत्तम डांबरी रस्ता आहे.
श्री विमलेश्वर मंदिर जांभ्या दगडाच्या गुहेत असून असून गाभारा, सभागृह
व गॅलरी अशा तीन टप्प्यात ही गुहा कोरलेली आहे. गाभा-यामध्ये शिवलिंग असून
मंदिरासमोर भव्य अंगण आहे. अंगणापासून मंदिराची उंची सुमारे 60 ते 65 फूट
आहे. मंदिराच्या दर्शनी मध्यभागावर पाच मानवरूपी नग्न शिल्पे कोरलेली असून
गुहेच्या दोन्ही बाजूला माहुतासह दोन हत्ती कोरलेले आहेत. अंगणातून देवळात
प्रवेश केल्यावर प्रथम गॅलरी लागते. तेथे एक मोठी घंटा टांगलेली आहे. त्याच्यापुढे
कातळावर 35 फूट रूंद व 15 फूट उंच असे सभागृह आणि त्याच्या बाजूने नक्षीकाम
केलेले मोठेमोठे खांब आहेत. तेथून थोडया पाय-या चढल्यानंतर साडेसहा फूट
उंच 16 फूट रूंद, 16 फूट लांब असा गाभारा लागतो. त्याच्या मध्यभागी शिवलिंग
आहे. अशा प्रकारचे उंचावर शिवलिंग असणारे हे एकमेव मंदिर आहे.
मंदिरातील शिवपिंडावर दररोज अभिषेक केला जातो. अभिषेकासाठी वापरले जाणारे
पाणी, दुध, निर्माल्य झालेली फुले इ. शेजारच्या डब्यात बकले जाते. ती तेथेच
मुरतात परंतु त्यातील पाण्याचा अंश अजिबात बाहेर जात नाही, ही बाब आश्चर्यकारक
आहे.
या मंदिरालगत मधुर पाण्याचा झारा बारामाही वहात असतो, घनदाट वनराईमुळे येथील
पाणी उन्हाळयाच्या थंडगार असते. तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ते उबदार असते.
मंदिराच्या दोन्ही बाजूला काळभैरव गुहा आहे.
रस्त्यावरून मंदिराचा फक्त कळस दिसतो. मात्र प्रत्यक्षात पाय-या उतरून अंगणामध्ये
जाऊन पाहिल्यास मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. सुंदर शिल्पकला आणि त्याच्या
जोडीला रम्य निसर्ग आणि मानवी बुध्दी यांचा सुंदर मिलाप असलेले हे स्थळ
पर्यटन दृष्टया अतिशय उत्तम स्थळ आहे. येथील घनदाट वनराई, रम्या आणि शांतता
मनमोहून टाकते. |